ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइनडिजिटल सेवेमुळे वेळ, श्रम व खर्चात बचत; २४ तास सेवा उपलब्ध

नाशिक। दि. १२ सप्टेंबर २०२६: नोंदणीकृत दस्तांची प्रमाणित प्रत नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ई-प्रमाण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष न जाता घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत मिळणार असून, वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संदिप आहेर यांनी दिली.

नोंदणीकृत दस्त, सूची क्रमांक २ किंवा विवाह प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आवश्यक असलेल्या नागरिकांनी ई-प्रमाण सेवेचा लाभ घ्यावा. ई-प्रमाण सेवेसाठी epraman.igrmaharashtra.gov.in या पोर्टलचा वापर करता येणार आहे. नोंदणीकृत दस्तांची ऑनलाइन माहिती शोधण्यासाठी विभागामार्फत ‘ई-सर्च’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून आवश्यक नोंदणीकृत दस्त शोधल्यानंतर ई-प्रमाण पोर्टलवर अर्ज करून त्याची डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत मिळविता येणार आहे. ही सेवा नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असून, सुरक्षित नोंदणी, जलद व पारदर्शक कार्यपद्धतीचा लाभ मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डुबेरे-सोनारी ते भगूर रस्त्यासह समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची प्रशासकीय मान्यता

ई-प्रमाण सेवेद्वारे प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नागरिकांनी प्रथम ई-प्रमाण पोर्टलवर नोंदणी करून लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक सेवा निवडून संबंधित तपशील भरून अर्ज करावा. लागू शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत ऑनलाइन प्राप्त करता येईल. प्रमाणित प्रत एसएमएस व ई-मेलद्वारेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 25 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

डिजिटल प्रमाणित प्रतीमुळे खर्चात बचत:
कागदी स्वरूपातील प्रमाणित प्रत घेण्याच्या तुलनेत डिजिटल प्रमाणित प्रत अधिक किफायतशीर आहे. उदाहरणार्थ, ३० पानांच्या दस्ताची कागदी प्रत घेताना प्रति पान २५ रुपये प्रमाणे ७५० रुपये खर्च येतो. त्याच दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत घेताना पहिल्या २० पानांसाठी १०० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक पानासाठी २ रुपये या दराने उर्वरित १० पानांसाठी २० रुपये, असा एकूण १२० रुपये खर्च येतो. त्यामुळे नागरिकांची ६३० रुपयांची बचत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’; घाटमाथ्यावर रविवारी ‘ऑरेंज अलर्ट’

अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८८८८००७७७७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री.आहेर यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790