नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

नाशिक। दि. ९ सप्टेंबर २०२६: आपल्या जागेवर मोबाईल टॉवर बसवून दरमहा २५ ते ५० हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बनावट संकेतस्थळे, फोन कॉल, संदेश व जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारे मोबाईल टॉवर बसविण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक तसेच वैयक्तिक माहितीची फसवणूक होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवा अथवा अवास्तव आश्वासनांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मोबाईल टॉवर बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास दरमहा मोठ्या रकमेचे भाडे मिळेल, असे सांगून नागरिकांना आकर्षित केले जात आहे. विशेषतः ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारच्या बनावट ऑफर दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता बीएसएनएलच्या नावाचा गैरवापर करून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार; पर्यटन विकासासाठी १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या कामांना मंजुरी

बीएसएनएलच्या नावाचा वापर करून मोबाईल टॉवर बसविण्याबाबत बनावट संकेतस्थळे तयार करण्यात आली असून, त्यावर रूफटॉप टॉवर बसविण्याच्या मोबदल्यात दरमहा २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले जात आहे. अशा संकेतस्थळांद्वारे नागरिकांकडून वैयक्तिक माहिती, कागदपत्रे अथवा अन्य संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीस फोनवरून किंवा ऑनलाइन माध्यमातून वैयक्तिक माहिती अथवा आर्थिक व्यवहाराची माहिती देऊ नये.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

बीएसएनएलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना बनावट संकेतस्थळे व टॉवर ऑफरबाबत सावध केले आहे. बीएसएनएलच्या नावाने मोबाईल टॉवर बसविण्यासाठी फोन, संदेश किंवा ऑनलाइन ऑफर प्राप्त झाल्यास त्याची सत्यता पडताळल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. टॉवर बसविण्याच्या नावाखाली शुल्क, नोंदणी फी, प्रक्रिया शुल्क अथवा अन्य कोणत्याही कारणाने पैसे मागितल्यास विशेष खबरदारी घ्यावी.

संशयास्पद कॉल किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करा:
नागरिकांनी मोबाईल टॉवरच्या नावाखाली मिळणाऱ्या अवास्तव आर्थिक आमिषांना बळी पडू नये. अनोळखी व्यक्तींना आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक, ओटीपी, पासवर्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणत्याही संकेतस्थळावर माहिती भरताना त्याची अधिकृतता तपासावी.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

मोबाईल टॉवर बसविण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी व्यक्ती किंवा संस्था आढळल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी. फसवणुकीचा प्रकार घडल्यास संबंधित व्यवहाराची माहिती, फोन क्रमांक, संदेश, संकेतस्थळाची माहिती व उपलब्ध पुरावे जतन करून तक्रार नोंदवावी.

मोबाईल टॉवरच्या नावाने मिळणारे मोठ्या उत्पन्नाचे आमिष हे फसवणुकीचे माध्यम ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अफवा व अवास्तव दाव्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा प्रकारची संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790