नाशिक: ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये मैथिली ठाकूर यांच्या भक्तिगीतांनी रसिक मंत्रमुग्ध

नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कुंभ भक्ती संगम’ मध्ये सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

पारंपरिक भारतीय लोकसंगीत, भक्तिसंगीत आणि विविध प्रादेशिक लोकपरंपरांचा सुरेल आविष्कार मैथिली ठाकूर यांनी आपल्या गायनातून सादर केला. मैथिली ठाकूर यांनी आपल्या सादरीकरणातून मैथिली आणि भोजपुरी लोकसंगीताची समृद्ध परंपरा रसिकांसमोर उलगडली. भक्तिगीते, रामचरितमानसवर आधारित रचना तसेच लोकगीतांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक भारतीय संगीताची आधुनिक डिजिटल माध्यमांशी सांगड घालत त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून रसिकांना भक्तिरसाचा अनुभव दिला.

🔎 हे वाचलं का?:  नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात

कार्यक्रमाची सुरुवात नामसंकीर्तनाने झाली. यावेळी ‘जय जय विठ्ठल रखुमाई’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘मनी नाही भाव देवा मला पाव’, ‘माझे माहेर पंढरी’ आदी मराठी भक्तिगीतांसह ‘राम आएंगे तो अंगना सजाऊँगी’, ‘राम को देखकर श्री जगत नंदिनी’, ‘यशोमती मैय्या से बोले नंदलाला’, ‘जगन्नाथ चका नैन’ आदी भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

‘राधिका गोरी से’ तसेच रामायणावर आधारित गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. त्यांनी भक्तिगीतांमधून भक्ती आणि अध्यात्माचा भावपूर्ण आविष्कार सादर केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘कुंभ भक्ती संगम’; आज (दि. २९) मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम

मैथिली ठाकूर यांनी भारतीय लोकसंगीताच्या विविधतेचा परिचय करून दिला. पारंपरिक वाद्यांचा प्रभावी वापर हे या सादरीकरणाचे विशेष आकर्षण ठरले.
मैथिली ठाकूर यांच्या सादरीकरणादरम्यान उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे स्वागत केले. त्यांच्या सादरीकरणामुळे *‘कुंभ भक्ती संगम’*च्या मंचावर भक्ती व लोकसंगीत परंपरांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विद्यापीठातून भविष्यातील उद्योग आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज भक्ती संगमाचा समारोप:
‘कुंभ भक्ती संगम’*च्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचे विशेष सादरीकरण होणार आहे. दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने या भक्तिमहोत्सवाची सांगता होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790