SIR चा पहिला टप्पा यशस्वी; आता प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणीवर भर द्यावा- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२६: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. आता एसआयआरच्या पुढील टप्प्यात प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी आणि त्यानंतरच्या कार्यवाहीचे काटेकोर नियोजन करावे, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

नाशिक विभागातील एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी (नाशिक) आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी (धुळे) भाग्यश्री विसपुते, जिल्हाधिकारी (अहिल्यानगर) डॉ.पंकज आशिया, जिल्हाधिकारी (जळगाव) रोहन घुगे, जिल्हाधिकारी (नंदुरबार) डॉ.मिताली सेठी, तसेच नाशिक विभागातील सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, तसेच मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज (दि. २७) दुपारी १ तासासाठी बंद

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, सर्व जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकांनी एसआयआरचा पहिला टप्पा निर्धारित कालावधीत पूर्ण केला. पहिल्या टप्प्यात संबंधित मतदार प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तव्यास आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात आली. एन्यूमरेशन फॉर्म, उपलब्ध निवडणूक नोंदींच्या आधारे मतदार नोंदींचे मॅपिंग करण्यात आले. यामुळे एसआरआयचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

आता दुसऱ्या टप्प्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे. इलेक्ट्रॉनिक रोल प्रिंटचे काम त्वरीत पूर्ण करावे. प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्रिय राहून नागरिकांना प्रक्रियेबाबत अचूक माहिती द्यावी. मतदार यादीत वगळलेल्या मतदारांचे काही आक्षेप असतील तर त्याचे निराकरण करावे. तसेच मतदाराचे नाव वगळलेल्यांना त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नमुना क्रमांक 6 भरुन देण्याबाबत अवगत करावे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोटीस बजावणी, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

वगळलेल्या मतदारांच्या आक्षेपांच्या अनुषंगाने त्यांना नोटीस बजावतांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा आणि सुनावणी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. मतदारांच्या शंकांना आणि आक्षेपांना तत्काळ प्रतिसाद द्यावा, जेणेकरून या प्रक्रियेविषयी कोणतेही गैरसमज पसरणार नाहीत. प्रसारमाध्यमांतून या प्रक्रियेविषयी अधिकाधिक प्रमाणात जागृती करून सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. राजकीय प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्याव्यात. प्रशिक्षण आयोजन करावे. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

प्रारुप यादी प्रसिद्धी नंतर मयत, स्थलातरीत, दुबार मतदाराची यादी बाबत तसेच एसआयआर प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच हरकती व सुनावणी प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी, असेही श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सर्व जिल्ह्यांनी एसआयआर प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरार जागृती करण्याच्या सूचना केल्या. यावेळी नाशिक विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील एसआयआरच्या कामाची सद्यस्थिती सादर केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790