नाशिक: माती, पाण्यासाठी धावले हजारो नाशिककर; मृद व जलसंधारण विभागातर्फे महा वॉकेथॉन संपन्न

नाशिक। दि. २१ ऑगस्ट २०२६: माती आणि पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तीचा प्रत्येकाने आवश्यकतेनुसार वापर करावा. याच भूमिकेतून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा संदेश दिला होता. त्यानुसार पृथ्वीच्या संरक्षणासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी डोंगरे वसतीगृह मैदान येथे महा वॉकेथॉन, वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी भरती

विभागीय आयुक्त डॉ गेडाम म्हणाले की, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत. आपल्याला भविष्यातील पिढीसाठी माती व पाण्याचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती आणि पाण्याचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी “वॉक फॉर वॉटर, या महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अभिनव भारत मंदिरातील विविध कामांसाठी अडीच कोटींची प्रशासकीय मान्यता

जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून एकात्मिक प्रयत्न करण्यात येत आहेत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0 आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 3.0 या प्रमुख योजनांमधून जलसाठे निर्माण करणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, गाळ काढणे, नाला खोलीकरण, मृदसंधारण तसेच सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. याबरोबर शासकीय कार्यालयांमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंगचे उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जलसंधारणाची ही वाटचाल म्हणजे केवळ बंधारे, नाला खोलीकरण किंवा गाळ काढण्याची कामे नव्हेतः तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन करून भविष्यातील जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. विविध विभागांचे अभिसरण, तंत्रज्ञानाचा वापर, कामांचे जिओ-टॅगिंग, निधीचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांच्या गरजांशी जोडलेली सिंचन व्यवस्था यामुळे जलसंधारणाला अधिक व्यापक आणि शाश्वत दिशा मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  पेठ, सुरगाण्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; कोणतीही हानी नाही

यावेळी महा वॉकेथॉनला मान्यवरांच्या उपस्थितीत डोंगरे वसतीगृहापासून सुरुवात होऊन अशोक स्तंभ मार्गे परत डोंगरे वसतीगृह येथे समारोप करण्यात आला. या महावॉकेथॉन मध्ये विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महावॉकेथॉन पूर्ण करणाऱ्या प्रथम तीन विजेत्यांना तसेच लकी ड्रा द्वारे निवडलेल्या सात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790