नाशिक: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी भरती

नाशिक। दि. २१ ऑगस्ट २०२६: आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या चार विभागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 22 ऑगस्ट रोजी आयोजन

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पवित्र पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या पदांची भरती करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेत पेसा क्षेत्रातील ८८५ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार ५३६ पदांचा समावेश आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची पदे यामध्ये समाविष्ट आहेत. उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’; आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

नाशिक विभागात ८२६, ठाणे विभागात ६१३, अमरावती विभागात ४६८ आणि नागपूर विभागात ५१४, अशी एकूण २ हजार ४२१ पदे उपलब्ध आहेत. आश्रमशाळा शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक तसेच आदिवासी क्षेत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा व नॉन-पेसा क्षेत्रांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक, गुणवत्ताधारित व नियमानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790