नाशिक। दि. १६ ऑगस्ट २०२६: श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 16 ऑगस्ट व सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी प्रशासनाने केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करून सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सर्च ट्रेंड्समध्येही त्र्यंबकेश्वरसंदर्भातील भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित सर्व विभागांच्या माध्यमातून वाहतूक व भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी लेन कटिंग, रॉंग साईडने वाहन चालविणे तसेच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणे टाळावे. प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहतूक मार्गांचा व नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा.
कुटुंबातील गर्भवती महिला, स्तनदा माता, गंभीर आजाराने त्रस्त व्यक्ती तसेच 0 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुले असल्यास, त्यांनी दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर यात्रा करण्याचे शक्यतो टाळावे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असली तरी पार्किंगच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत काही अंतर पायी चालावे लागू शकते. त्यामुळे भाविकांनी त्यानुसार आवश्यक नियोजन करावे.
त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचे वातावरण असल्याने प्रत्येकाने पिण्याच्या पाण्याची बाटली व छत्री सोबत ठेवावी. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी.
भाविकांची यात्रा सुखकर व सुरक्षित व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाने संयम व खबरदारी बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.
त्र्यंबक नगरपालिका, नाशिक ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, महसुल, महावितरण (MSEDCL) तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
“गर्दीची शक्यता लक्षात घेता प्रत्येक भाविकाने विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे परिपूर्ण पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे.
![]()


