नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२६: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत नाशिक जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला असून, जिल्ह्यातील 51 लाख 4 हजार 458 मतदारांपैकी 49 लाख 82 हजार 557 मतदारांना EFs फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे. फॉर्म वितरणाची कार्यवाही 97.61 टक्के पूर्ण झाली असून, 39 लाख 42 हजार 653 फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रियेच्या एकूण कामाची प्रगती 90.24 टक्के झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
दिंडोरी, इगतपुरी व निफाडमध्ये 99 टक्क्यांहून अधिक काम:
मतदारसंघनिहाय SIR कामाच्या प्रगतीमध्ये दिंडोरी (ST) विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 99.88 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ इगतपुरी (ST) 99.41 टक्के, निफाड 99.04 टक्के आणि नांदगाव 98.16 टक्के काम पूर्ण झाले आहे.
बागलाण (ST) येथे 96.45 टक्के, येवला 96.09 टक्के, कळवण (ST) 96.02 टक्के, नाशिक पूर्व 95.11 टक्के, चांदवड 93.51 टक्के आणि सिन्नर येथे 93.18 टक्के काम पूर्ण झाले आहे.
देवळाली (SC) येथे 87.88 टक्के, मालेगाव मध्य 85.60 टक्के, मालेगाव बाह्य 85.04 टक्के आणि नाशिक मध्य 83.27 टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात 61.53 टक्के काम पूर्ण झाले आहे.
4 लाख 98 हजार 419 नोंदींचे काम प्रलंबित:
जिल्ह्यातील 6 लाख 63 हजार 386 नोंदी ‘Uncollectable’ म्हणून नोंदविण्यात आल्या असून, त्याचे प्रमाण 13 टक्के आहे. सद्यस्थितीत 4 लाख 98 हजार 419 नोंदींचे काम प्रलंबित असून, प्रलंबित कामाचे प्रमाण 9.76 टक्के आहे.
नागरिकांनी SIR प्रक्रियेत सहकार्य करावे:
एसआयआर प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी केले आहे.
![]()


