नाशिक परिक्रमा मार्गासाठी थेट खरेदीद्वारे भूसंपादन; भूधारकांनी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२६: नाशिक परिक्रमा मार्ग (Nashik Ring Road) या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्यामार्फत प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट गावांतील संबंधित भूधारकांनी तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीद्वारे भूसंपादनासाठी नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित

नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीमध्ये दिंडोरी तालुक्यातील वरवंडी तसेच नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, आंबेबहुला, मुंगसरे, मातोरी, चांदशी, आडगाव, मुखमलाबाद, पाथर्डी, पिंपळगाव बहुला, पिंपळगाव खांब, देवळाली, वडनेर दुमाला, विहीतगाव, सारोळे, विंचूरगवळी, माडसांगवी, बेलगाव ढगा व पंचक या गावांचा समावेश आहे. या गावांतील संबंधित भूधारकांनी MSIDC यांच्यामार्फत करण्यात आलेल्या आवाहनानुसार तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीद्वारे भूसंपादनाची नोंदणी करून घ्यावी.

🔎 हे वाचलं का?:  SIR: नाशिक पूर्वसह चार मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन दिवस विशेष शिबिर

सामाईक गट क्रमांकाच्या बाबतीत आवश्यकतेनुसार संयुक्त बँक खाते उघडून भूसंपादनाचा मोबदला संबंधित संयुक्त बँक खात्यात वर्ग करून घेण्यात यावा. थेट खरेदीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संबंधित भूधारकांनी MSIDC कार्यालय, दुसरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारत, नाशिक येथे दि. 12 ऑगस्ट 2026 पर्यंत संपर्क साधावा.

प्रत्येक गावाचा प्रारूप अंतिम निवाडा जाहीर होईपर्यंतच थेट खरेदीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्यात येणार नसल्याने संबंधित भूधारकांनी याची नोंद घ्यावी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोमवारी (दि. १०) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक परिक्रमा मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित सर्व भूधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह केवासी प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790