Amazon

नाशिक: ‘अमृत’ मार्फत ‘पराक्रम दिना’ निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

नाशिक। दि. ३१ जुलै २०२६: शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १८ ऑगस्ट ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मार्केट यार्डातील दुकानावर FDAचा छापा; ३ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त

‘पराक्रम दिन’ उपक्रमाच्या नियोजनासाठी अमृत संस्थेमार्फत पराक्रम दिन समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये इतिहासतज्ज्ञ काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर आणि कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि रिल्स या तीन प्रकारांचा समावेश आहे. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आल्या असून रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी खुली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

निबंध स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त १ हजार शब्दांचा निबंध पीडीएफ स्वरूपात सादर करावयाचा आहे. निबंधासाठीचे संदर्भ ‘अमृत पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळावरील संदर्भ साहित्यावर आधारित असावेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतःच्या भाषणाचा कमाल सात मिनिटांचा मूळ व्हिडिओ सादर करावयाचा असून त्यामध्ये कोणतेही व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे तयार करण्यात आलेल्या प्रतिमांचा वापर करता येणार नाही.

स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ असा असून स्पर्धेचे विषय, नियमावली, बक्षिसांची माहिती, प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रिया, संदर्भ पुस्तके तसेच थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील ई-बुक ‘पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळ https://parakramdin.mahaamrut.org.in/ यावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्पर्धेसाठीची प्रश्नावली अधिकृत संदर्भ साहित्य आणि ई-बुकच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘पराक्रम दिन’ उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790