रशियात शिकणाऱ्या १७ भारतीय विद्यार्थ्यांची ३.४८ कोटींची फसवणूक; नाशिकच्या तरुणाला अटक !

नाशिक। ३० जुलै २०२६: रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १७ भारतीय विद्यार्थ्यांची तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय चलनाचे रशियन चलनात (रुबल) विनिमय करून देण्याचे आमिष दाखवत ही रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, या घटनेमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरण; मंडळ अधिकारी व निवृत्त अधिकाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पृथ्वीराज पद्मसिंह चांडे (वय २३) हे रशियातील चिवास स्टेट विद्यापीठात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यांची २०२३ मध्ये मित्र अमर काकडे यांच्या माध्यमातून संशयित शुभम राकेश सिंग (रा. ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी ओळख झाली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयिताने स्वतःला भारतीय विद्यार्थ्यांचे करन्सी एक्स्चेंजचे काम करणारा म्हणून सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने एका विद्यापीठाच्या नावाचे कथित अधिकृत पत्रही दाखवले. सुरुवातीला आगाऊ घेतलेली रक्कम रशियन चलनात परत करून तसेच नंतर काही व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण करून त्याने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरणाचा विसर्ग ८,१६० क्युसेकवर; बुधवारपासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’

यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पृथ्वीराज चांडे यांच्याकडून ७ लाख रुपये, त्यांच्या आठ मित्रांकडून ५३ लाख रुपये, तर त्याच विद्यापीठातील अन्य आठ विद्यार्थ्यांकडून २ कोटी ८८ लाख रुपये, अशी एकूण ३ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम भारतीय चलनातून रशियन चलनात रूपांतरित करून देण्याच्या नावाखाली स्वीकारण्यात आली. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना रशियन चलन न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार 'कुंभ कक्ष'; सिंहस्थ २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

पोलिसांच्या तपासानुसार, रशिया-युक्रेन युद्धानंतर भारतीय चलनाचे रशियन चलनात विनिमय करताना निर्माण झालेल्या अडचणींचा फायदा घेत संशयिताने विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने विश्वासाचे जाळे विणून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शुभम राकेश सिंग याला अटक केली असून, या आर्थिक फसवणुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच अशाच प्रकारे इतर विद्यार्थ्यांनाही गंडा घालण्यात आला आहे का, याचा तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790