Amazon

नाशिकमध्ये 4 ऑगस्ट रोजी निर्यात प्रोत्साहन शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद; उद्योजकांनी संधीचा लाभ घ्यावा

नाशिक। दि. ३० जुलै २०२६: नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक अभियांत्रिकी क्लस्टर,C-10, अंबड MIDC, नाशिक येथे सकाळी 10 वाजता ‘निर्यात प्रोत्साहन शिबिर (Export Awareness Camp) व ई-कॉमर्स शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योगांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, ई-कॉमर्सच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना आवश्यक मार्गदर्शन देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, केपीएमजी चे भागीदार प्रितममोहन सिंह, सहयोगी व्यवस्थापक प्रितम देशमुख, सह्याद्री फार्म (DISQ) चे संदिप शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, कृषी व कृषीपूरक क्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी उत्पादने तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात नाशिक जिल्ह्याची निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा, त्यांची निर्यात वाढावी आणि परदेशात ई-कॉमर्सच्या वाढत्या संधींचा लाभ घेता यावा, यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे. या शिबिरात अॅमेझॉन, शिपरॉकेट, फेडएक्स आणि डीएचएल यांसारख्या अग्रगण्य ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्स कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या ठिकाणी उद्योग संघटना आणि निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती राहणार असून निर्यात प्रोत्साहन शिबिराच्या माध्यामातून उद्योजकांना थेट संवाद साधून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

शिबिरात निर्यात प्रक्रिया, निर्यातीसंदर्भातील नियम व कार्यपद्धती, डिजिटल व्यापाराच्या संधी, सीमापार मालवाहतूक (लॉजिस्टिक्स), शासनाच्या विविध योजना व प्रोत्साहनपर तरतुदी याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जागतिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर व्यवसायाची नोंदणी, निर्यात व्यवस्थापन आणि निर्यात व्यवसायाचा विस्तार याबाबत व्यावहारिक माहिती दिली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

जिल्हा प्रशासन उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी, निर्यातदारांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यापार व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्याची निर्यात क्षमता अधिक बळकट होऊन स्थानिक उद्योगांना जागतिक मूल्यसाखळीशी जोडण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील निर्यातदार, एमएसएमई उद्योजक, स्टार्टअप्स, कृषी उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच निर्यात क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांनी ४ ऑगस्ट रोजी आयोजित निर्यात प्रोत्साहन शिबिरात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790