Amazon

नाशिक: म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरण; मंडळ अधिकारी व निवृत्त अधिकाऱ्याला अटक

नाशिक। दि. ३० जुलै २०२६: बनावट भूमी अभिलेख नकाशे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासन तसेच म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आणखी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तहसील कार्यालयातील कार्यरत मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघांना ४ ऑगस्टपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

मार्च महिन्यात सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि खोटे नकाशे तयार करून तब्बल ४५ लेआउटची विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १९८ विकासक आणि व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपासानंतर दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दोन महसूल अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मार्केट यार्डातील दुकानावर FDAचा छापा; ३ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त

पोलिस तपासानुसार, संशयितांनी विकासक, जमीनमालक आणि गुंतवणूकदारांशी संगनमत करून भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म क्रमांक ४ व १२, गटबुक तसेच अन्य कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता फेरफार नोंदी मंजूर केल्या. काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाचा आदेश नसतानाही प्रत्येकी १४ सर्व्हे/गटांमधील फेरफार नोंदी बेकायदेशीररीत्या प्रमाणित केल्याचे तपासात समोर आले असून, त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घराची किल्ली न सापडल्याच्या कारणावरून १९ वर्षीय पत्नीची हत्या; २१ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा

गेल्या आठवडाभरापासून दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती. तपासादरम्यान गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सरकारवाडा पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790