Amazon

नाशिकच्या दक्षिण भागात ३१ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा इशारा

नाशिक। दि. २९ जुलै २०२६: भारतीय हवामान विभागाने शुक्रवार ३१ जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी जलसंपदा विभागचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या समवेत बैठक घेतली व आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी धरण व्यवस्थापनाबाबत विशेष सूचना देताना मुक्त पाणलोट क्षेत्रातून (Free Catchment) होणारा अतिरिक्त पाऊस सामावून घेता यावा आणि अचानक पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याचे निर्देश दिले. पूर नियंत्रण कक्षाने धरणांमधील पाणीसाठ्याचे सातत्याने परीक्षण करून पाण्याचे नियोजन वेळेवर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नदी-नाल्यांवरील कमी उंचीच्या पुलांवर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी चोवीस तास सतर्क राहावे. आवश्यकतेनुसार वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना तात्काळ राबवावी, जेणेकरून कोणतीही जीवितहानी अथवा अपघाताची घटना घडणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

शहर व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व पावसाळी नाले आणि सांडपाणी वाहिन्यांमधील प्लास्टिक व इतर अडथळे तातडीने हटवून पाण्याचा निचरा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. नाल्यांमध्ये अडथळे राहिल्यास शहरांमध्ये व गावांमध्ये पाणी साचून फ्लॅश फ्लडसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नालेसफाईला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सक्शन पंप, जेसीबी, पोकलेन, महावितरणची ब्रेकडाउन वाहने तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ आणि बचाव पथके चोवीस तास सज्ज ठेवावीत. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

आरोग्य विभागाने ४ ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या सर्व गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वनियोजनाद्वारे जवळच्या शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची सातत्याने पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

नागरिकांना आवाहन:
“सध्या घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र अलीकडे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790