नाशिक | दि. २९ जुलै २०२६: गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी दोन टप्प्यांत वाढ करण्यात आली असून, सध्या एकूण ८,१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने बुधवार ते शुक्रवार (३१ जुलै) दरम्यान पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वी सुरू असलेल्या ४,९४७ क्युसेक विसर्गात मंगळवारी सायंकाळी ४ वाजता १,९९९ क्युसेक आणि रात्री ९ वाजता आणखी १,२१४ क्युसेक वाढ करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीत सध्या ८,१६० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
मंगळवारी नाशिक शहरात जोरदार पावसाऐवजी अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव झाला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभर पावसाने उघडीप दिली आणि काही काळ उन्हाही पडले. शहराचे कमाल तापमान २७.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असला तरी गौतमी आणि कश्यपी नदीतून धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. धरणातील जलसाठा नियोजित पातळीवर आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोन टप्प्यांत विसर्ग वाढविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रात २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
![]()


