नाशिक: शालेय बस, व्हॅन चालकांनो नवीन नियमांची तीन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई

नाशिक। दि. २२ जुलै २०२६: राज्य शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम 2026 अधिसूचित केले असून ते 16 जुलै 2026 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झाले आहेत.

या नियमानुसार सर्व शाळा, शालेय बस, शाळा व्हॅन व शैक्षणिक संस्थांनी तीन महिन्यांच्या आत नवीन नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

नवीन नियमावलीनुसार शालेय वाहतुकीचे शुल्क प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करेल. प्रत्येक शाळेत शाळा परिवहन समितीतर्फे वाहतूक व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात येईल. पालकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. चालक, महिला परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी पडताळणी, वैद्यकीय तपासणी व लेखी नियुक्ती करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांची वाहनात चढण्याची व उतरण्याची दैनंदिन नोंद ठेवावी लागेल. पूर्व – प्राथमिक ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे आवश्यक राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

दिव्यांग, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. सर्व शालेय बस व शाळा व्हॅनमध्ये जीपीएस (VLTD), पॅनिक बटन, सीसीटीव्ही, सर्व आसनांसाठी सीट बेल्ट तसेच फायर डिटेक्शन सिस्टिम किंवा अग्निशामक यंत्र असणे आवश्यक राहील. शालेय बसचे कमाल वय 20 वर्षे राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

सर्व शाळा व्यवस्थापन, शालेय बस, शाळा व्हॅन मालक, वाहन चालक, वाहतूक कंत्राटदार, पालकांनी शासनाने अधिसूचित केलेल्या नियमांचे पालन करून आवश्यक कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी. या नियमांचे पालन न केल्यास मोटार वाहन कायदा व नियमानुसार संबंधित परवान्यावर निलंबन अथवा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790