नाशिक: ‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमात उद्योगांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. १५ जुलै २०२६: जिल्ह्यातील उद्योगांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडचणींचे समन्वयातून त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शुक्रवार,१७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजला येथील सभागृहात करण्यात आले आहे. या उद्योगाभिमुख उपक्रमात जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, उद्योजक व उद्योग प्रतिनिधी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष उपक्रमाच्या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निमाचे अध्यक्ष अध्यक्ष आशिष नाहर, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MCCIA)चे प्रतिनिधी मिलिंद राजपूत, कल्पेश लोया व रवींद्र झोपे, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी प्रशांत पाटील व केपीएमजीचे सल्लागार अक्षय भोईटे व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, जिल्हा गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार (MoU) केलेल्या उद्योगांसह जिल्ह्यातील सर्व लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. उद्योगांना विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, आवश्यक परवानग्या, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, बँकिंग, पर्यावरणविषयक बाबी तसेच इतर उद्योगविषयक अडचणींबाबत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची आणि त्वरित मार्गदर्शन मिळविण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

उद्योगांच्या समस्या ‘एकाच छताखाली’ सोडविण्याच्या उद्देशाने विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, उद्योगांच्या अडचणींचे समन्वयाने आणि वेळेत निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करणे, गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ करणे आणि उद्योगांना प्रशासनाची प्रभावी साथ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

उद्योग हा कोणत्याही प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असतो. नाशिकमध्ये आयोजित उद्योग कुंभातून सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. आता या करारांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने आयोजित केलेला ’संकल्प ते सिद्धी’ मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व विभागांना एकाच व्यासपीठावर आणून त्या सोडविण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे निमाचे अध्यक्ष श्री नहार यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790