नाशिक: कुटुंबीय घरात असतांना जुन्या वादातून घर पेटवून देण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा

नाशिक। १५ जुलै २०२६: जुन्या वादाच्या कारणावरून एका कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीत उघडकीस आली आहे. घराचे दार बाहेरून बंद करून घरावर ज्वलनशील द्रव टाकत आग लावल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ जुलै) पहाटे सुमारे ३ वाजता फिर्यादी सुधाकर शंकर दांडेकर (वय ३८) हे कुटुंबासह घरी झोपलेले असताना हा प्रकार घडला. त्यावेळी घरात त्यांच्या पत्नी, मुले तसेच इतर कुटुंबीय उपस्थित होते.

याप्रकरणी सूरज दांडेकर (वय १९), प्रदीप ऊर्फ भैया दांडेकर (वय २१) आणि पवन दत्ता गायकवाड (वय १८, सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) यांनी जुन्या वादातून घराचे मुख्य दार बाहेरून बंद केले. त्यानंतर घरावर ज्वलनशील द्रव टाकून आग लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

आगीची घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांची मदत मागितली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गिरी पुढील तपास करत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५९१/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790