नाशिक: भावली धरण परिसरात कुटुंबावरील हल्लाप्रकरणी नऊ जण अटकेत

नाशिक। दि. १४ जुलै २०२६: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण व धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकमधील एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नऊ संशयितांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी तीन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी (दि. १२ जुलै) घडलेल्या या घटनेत कुटुंबातील एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. त्यास विरोध केल्यानंतर आरोपींनी संबंधित कुटुंबाच्या वाहनाचा सुमारे १५ किलोमीटर पाठलाग करत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

घटनेनंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अंबड पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत इगतपुरी तालुक्यातील विविध भागांतून नऊ संशयितांना ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले सर्व संशयित इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून त्यापैकी एका आरोपीविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान संशयितांनी आकाश भोईर, तुषार कडू आणि कैलास भागडे यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हे तिघे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेले संशयित गिरणारे, नांदगाव सदो, माणिकखांब, बलायदुरी आणि देवळे-घोटी परिसरातील रहिवासी आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे

  • विशाल मच्छिंद्र भटाटे (२७)
  • अनिकेत गणेश मानवेढे (२४)
  • अनिरुद्ध विठोबा भागडे (२५)
  • सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (२२)
  • विनोद लक्ष्मण बोराडे (२६)
  • सचिन दत्तू आडोळे (२९)
  • अर्जुन चिंधू आडोळे (२५)
  • देविदास कचरू भगत (२५)
  • अजय भूषण दालभगत (२०)

काय घडले होते?

नाशिक शहरातील आठ सदस्यांचे एक कुटुंब भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात दोन तरुणांनी कुटुंबातील एका महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेच्या पतीने याबाबत जाब विचारल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यावेळी आरोपींनी आक्रमक भूमिका घेतली; मात्र कुटुंबीयांनी प्रतिकार केल्याने तेथून निघून गेले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

यानंतर काही अंतरावर इतर साथीदारांसह आरोपी पुन्हा समोर आले. वाद टाळण्यासाठी कुटुंबीयांनी आपल्या टाटा सफारीमधून तेथून प्रस्थान केले. मात्र आरोपींनी बलेनो कार आणि दुचाकींच्या मदतीने त्यांच्या वाहनाचा सुमारे १५ किलोमीटर पाठलाग केला. धावत्या वाहनावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सफारीच्या पुढील आणि मागील काचा फुटल्या, तर काचांचे तुकडे लागून वाहनातील काही महिलांना किरकोळ दुखापत झाली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थेट अंबड पोलीस ठाण्यात नेल्याने पुढील अनर्थ टळला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790