नाशिक: मतदार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 10 ते 12 जुलै रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

नाशिक। दि. १० जुलै २०२६: भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR ) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार गणना अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 ते 12 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक उपस्थित राहून मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात मतदरांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

मतदारांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Fill Enumeration Form’ पर्यायाद्वारे आपला मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी वापरून ओटीपीद्वारे लॉगइन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती तपासून Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर करता येईल.

ज्या मतदारांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांनी 10 ते 12 जुलै दरम्यान आयोजित विशेष शिबिरात आपल्या मतदान केंद्रावर जाऊन BLO यांच्या मदतीने Enumeration Form भरावा. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार ओळखपत्र (EPIC) तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महावितरणतर्फे शहरात तक्रार निवारणासाठी विविध संपर्क क्रमांक जारी

अनेक मतदार नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर असल्याने BLO यांना प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य होत नाही. अशा मतदारांनी स्वतःहून ऑनलाइन अर्ज भरावा किंवा विशेष शिबिरात सहभागी होऊन प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी अथवा मदतीसाठी हेल्प डेस्क क्रमांक 0253-2310523 येथे संपर्क साधावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क राहून तत्काळ प्रतिसाद द्यावा- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

या विशेष मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, बूथ लेव्हल एजंट (BLA), सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, युवक व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790