Amazon

नाशिक: नागरिकांनी पावसाळी पर्यटन टाळण्याचे आवाहन

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण, पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली होती. हा पट्टा आता दक्षिणेला अहिल्यानगरकडे, तर पश्चिमेला सुरतकडे सरकला आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे संकट टळले असले तरी पुढील तीन दिवस नागरिकांनी पर्यटनस्थळे, धबधबे या परिसरात जाऊ नये, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रवासी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जखमी

जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर मंत्री श्री. महाजन हे सोमवारी (६ जुलै) रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी रात्रीच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज दुपारी मंत्री श्री. महाजन यांनी पालघरकडे रवाना होण्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: "नवरात्रीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासह सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे"- जिल्हाधिकारी

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत पावसाळी पर्यटन, धबधबे, गडकिल्ले, धरण परिसर, नदी काठावर जाणे धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच भावडबारी रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. रस्त्यांवरील दगड, माती तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन सतर्क असून त्यांनी कार्यवाही केली आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790