नाशिक। दि. ३ जुलै २०२६: शहर आणि परिसरात गुरुवारी (दि. २) सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असले, तरी सायंकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दरम्यान, हवामान विभागाने शनिवार (दि. ४) आणि रविवार (दि. ५) रोजी नाशिकच्या घाटमाथा आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी (दि. ३) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून सुरू असल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रस्ते ओले झाले असून, सखल भागांमध्ये पाणी साचणे आणि चिखलाची समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागासह दक्षिणेकडील उपनगरांमध्ये पावसाचा जोर तुलनेने अधिक राहिला. मात्र पंचवटी, मेरी आणि म्हसरूळ परिसरात पावसाचे प्रमाण कमी नोंदविण्यात आले. त्यामुळे पेठ रोड येथील हवामान निरीक्षण केंद्रात गुरुवारी दिवसभरात केवळ १.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील २४ तासांत ९.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून, चालू हंगामात शहरात आतापर्यंत एकूण ७६.१ मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आदी घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने पाण्याची आवक वाढू शकते. सध्या जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा झालेला नसून अनेक धरणांची पातळी अद्याप तळाजवळच आहे.
![]()


