
नाशिक। दि. १ जुलै २०२६: चोरीला गेलेला ऐवज परत मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली असतानाच नाशिक शहर पोलिसांनी १ कोटी ३६ लाख २५ हजार रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल मूळ तक्रारदारांच्या स्वाधीन करून अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला. परिमंडळ-१ अंतर्गत आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका आणि गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांमधील मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने फिर्यादींना परत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख आणि प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकरणांतील तक्रारदारांना महिनाअखेरीस मुद्देमाल वितरित करण्यात आला.
मुद्देमाल परत मिळाल्याची माहिती पोलिसांनी तक्रारदारांना संपर्क साधून दिल्यानंतर अनेकांनी भावुक होत आनंदाश्रू व्यक्त केले. या वितरणामध्ये घरफोडीत चोरीस गेलेली १ लाख ४४ हजार रुपयांची रोकड, ३०२.७७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५१ दुचाकी, ९ चारचाकी वाहने, २६ मोबाईल फोन, विविध इलेक्ट्रिकल साहित्य, ३ लॅपटॉप, एक साऊंड सिस्टीम तसेच एसी कॉम्प्रेसर आदी मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यात आला.
![]()


