नाशिकला पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’

नाशिक। दि. ३० जून २०२६: शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असला, तरी पावसाने अद्यापही नाशिककरांना हुलकावणीच दिली आहे. सोमवारी (दि. २९) दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले; मात्र अपेक्षित पाऊस न पडल्याने नागरिकांची निराशा झाली.

🔎 हे वाचलं का?:  ‘स्वामी आहे उभा’ भक्तिगीत रसिकांच्या भेटीला; स्वामी समर्थांच्या भक्तीचा जागवला सुरेल आविष्कार

शहरासह ग्रामीण भागातही पावसाची समाधानकारक नोंद झाली नाही. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून, दुपारनंतर काही काळ पावसाळी वातावरण निर्माण होते; मात्र पाऊस न पडताच ढग विरून जात असल्याने पुन्हा उन्हाचा चटका जाणवतो. परिणामी वातावरणात उकाडा आणि दमटपणा वाढला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगरटाकळी मार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ जुलैपर्यंत कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार होत असल्याने तिचा परिणाम राज्यातील विविध भागांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर ४ जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, त्याचा प्रभाव नाशिक जिल्ह्यावरही जाणवू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाशिकमध्येही दमदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कालावधीत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790