नाशिक। दि. १७ जून २०२६: ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे राज्यात आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे नियोजन करून पशुधनासाठी आवश्यक खाद्यसाठा उपलब्ध करून ठेवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
‘एल निनो’मुळे पर्जन्यमानात घट अथवा अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर तसेच दुग्धोत्पादनावर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक व शेतकरी बांधवांना पोषक आणि बहुउद्देशीय चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. गाई-म्हशींच्या संतुलित पोषणासाठी अशा चारा पिकांची निवड करावी, ज्यातून मुख्य पीक उत्पादनासोबतच दर्जेदार हिरवा व सुक्या स्वरूपातील चारा उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर अथवा नैसर्गिकरित्या उगवणारे गवत वाया जाऊ न देता त्याचे योग्य व्यवस्थापन व जतन करावे. पावसाची ओढ अथवा टंचाईच्या काळात हा चारा पशुधनासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो. भविष्यातील संभाव्य संकटाचा विचार करून उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा उत्पादन घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. उत्पादित अतिरिक्त चाऱ्याची ‘मुरघास’ (सायलेज) अथवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवणूक केल्यास टंचाईच्या काळात जनावरांच्या खाद्याची गरज सहज पूर्ण होऊ शकते. त्यामुळे पशुपालकांनी दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टीने चारा साठवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे.
पशुसंवर्धन विभागामार्फत ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी राज्यभर विविध माध्यमांतून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत असून, पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. पशुपालकांना कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास त्यांनी विभागाच्या १९६२ या टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधून माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहनही विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
एल निनोच्या संभाव्य सावटामुळे उद्भवणाऱ्या चारा टंचाईचा फटका पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची प्रभावी साठवणूक यामुळे पशुधनाचे पोषण आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवणे शक्य होईल. सर्व पशुपालकांनी या आवाहनाची दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहनही पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पाटील यांनी केले आहे.
![]()


