नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

नाशिक। दि. १२ जून २०२६: नाशिकरोड परिसरातील बीएसएनएल कार्यालयाजवळून भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम केबल चोरी झाल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट-१ ने मोठी कारवाई करत मुंबईतील भांडुप येथून तब्बल २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींकडून चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली असून, नाशिक शहरातील आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

सन २०२४ मध्ये नाशिकरोड हद्दीतील बीएसएनएल कार्यालयाजवळून कंपनीच्या भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम केबलची चोरी झाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडून सुरू असताना अटक आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न

तपासादरम्यान चोरीस गेलेल्या बीएसएनएलच्या भूमिगत कॉपर वायरचा मोठा साठा मुंबईतील भांडुप येथील एका गोदामात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१, गुंडा पथक आणि अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने भांडुप येथे छापा टाकला.

गोदामाची तपासणी केली असता १७.५ टन विविध प्रकारच्या अॅल्युमिनियम केबल वायर, १४.५ टन जेलीफिल्ड वायर जाळून वेगळे करण्यात आलेले कॉपर तसेच १.५ टन अॅल्युमिनियम केबल वायर असा एकूण २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

या प्रकरणात संशयित वाहाब अब्दुल नवाज (३५), सुरेश दिलीप वैराळ (३७), बसंतलाल राजाराम यादव (३८), कमलेशकुमार सुखदेव रविदास (२६), तनविर मुफसीर शेख (३१) आणि राजकुमार केशुलाल जैन (५०) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून ही महत्त्वाची माहिती समोर आली.

या कारवाईमुळे केबल चोरीच्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, आरोपींच्या चौकशीतून नाशिक शहरातील विविध भागांतील आणखी पाच गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडून सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीमखान पठाण, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, श्रीकांत सुर्यवंशी, सुनिल भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, हवालदार दिपक पाटील, दिपक दिवटे, समाधान पवार तसेच गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व पथक तसेच अंबड गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भुषण सोनवणे, भगवान जाधव यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790