नाशिक, दि. १२ जून २०२६ : घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. अफजल हुसेन सैय्यद (वय ३१, रा. भगूर, ता. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये निष्पन्न होऊनही फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-२कडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन प्रकरणांतील फरार आरोपी अफजल सैय्यद याचा शोध सुरू होता.
दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका परिसरात सापळा रचला. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी यांच्या नेतृत्वाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत अफजल सैय्यद याने आपल्या साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांच्या पथकाने केली.
![]()


