नाशिक: जिल्ह्यात दररोज ११८ टँकरच्या २५६ फेऱ्या; जिल्ह्यातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर…

नाशिक। दि. २५ मे २०२६: प्रखर उन्हामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून ग्रामीण भागातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या जिल्ह्यात दररोज ११८ टँकरच्या माध्यमातून २५६ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १०९ गावे आणि २३८ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

यंदाच्या उन्हाळ्यात नाशिककरांनी तीव्र उष्णतेचा सामना केला. सलग चार ते पाच दिवस तापमान ४० अंशांच्या पुढे कायम राहिल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून जलसाठ्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी भूजल पातळीही लक्षणीयरीत्या घसरली आहे.

जिल्ह्यातील सात मोठे आणि १९ मध्यम अशा एकूण २६ प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे २१ हजार ५३४ दलघफू म्हणजेच केवळ ३०.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्याचा अजून आठवडा बाकी असून, मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली तरी जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

दरम्यान, पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील ४७ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १६ विहिरींचा समावेश आहे.

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टक्केवारीत):

  • गंगापूर – ४०.८२
  • मुकणे – ३०.७६
  • करंजवण – २३.०७
  • ओझरखेड – ३६.२०
  • दारणा – २०.१७
  • भावली – २६.८५
  • वालदेवी – ६१.६९
  • चणकापूर – ४१.८६
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

सर्वाधिक चिंताजनक स्थितीतील धरणे:

  • वाघाड – २.४८
  • भोजापूर – २.४९
  • पुणेगाव – ४.६५
  • आळंदी – ७.८४
  • तीसगाव – ८.१३
  • वाकी – ८.५९

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790