नाशिकला उष्णतेचा कहर… यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२ अंशांवर तापमान

नाशिक। दि. ११ मे २०२६: नाशिक शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (दि. ११) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सलग तिसऱ्या दिवशी तापमानाने चाळिशी पार केल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला, तर रात्रीही उकाड्याने नागरिकांची झोप उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास स्थिर होते, तर किमान तापमान २२ अंशांच्या पुढे कायम असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, गेल्या काही दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (दि. ९) ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर रविवारी (दि. १०) तापमान ४०.६ अंशांवर पोहोचले आणि सोमवारी त्याने थेट ४२ अंशांचा टप्पा गाठला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळेत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाचे दिवस:

  • ११ व १३ मार्च : ३७.८ अंश सेल्सिअस
  • १४ एप्रिल : ३९.३ अंश सेल्सिअस
  • १९ एप्रिल : ३९.४ अंश सेल्सिअस
  • २३ एप्रिल : ३९.९ अंश सेल्सिअस
  • २५ एप्रिल : ४१.५ अंश सेल्सिअस
  • २६ एप्रिल : ४१.४ अंश सेल्सिअस
  • ९ मे : ४०.१ अंश सेल्सिअस
  • १० मे : ४०.६ अंश सेल्सिअस
  • ११ मे : ४२.० अंश सेल्सिअस
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पात्र मतदारांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी बाजारपेठा आणि रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांना उष्माघाताचा धोका वाढला आहे.

उष्णतेपासून बचावासाठी काय कराल?

  • दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे
  • भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे
  • हलक्या रंगाचे आणि सैल कपडे वापरावेत
  • उन्हात बाहेर पडताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा
  • शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा डोकेदुखी जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790