Amazon

एप्रिलमध्येच उष्णतेचा कडाका; राज्यात तापमानाचे उच्चांक, ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

नाशिक। दि. २८ एप्रिल २०२६: सामान्यतः मे महिन्यात जाणवणारी तीव्र उष्णता यंदा एप्रिलमध्येच अनुभवायला मिळत असून राज्यातील अनेक भाग अक्षरशः तापले आहेत. नाशिकमध्ये अलीकडेच हंगामातील उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगर येथे ४३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचत गेल्या सात वर्षांतील उच्चांक गाठला. सोलापूरमध्ये सलग दोन दिवस ४३.९ अंश तापमान नोंदले गेले असून, अहिल्यानगरमध्ये ४१.८ अंशांची नोंद झाली आहे.

राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मंगळवारी अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्याचवेळी यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारपासून उष्णतेची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक भागांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

देशपातळीवर पाहता, यंदाच्या एप्रिल महिन्यात विविध ठिकाणी सुमारे ४५ वेळा तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. २०२२ नंतरची ही सर्वाधिक नोंद असून, गेल्या चार वर्षांतील हा सर्वात उष्ण एप्रिल मानला जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून निरभ्र आकाश आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ४७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून, एप्रिल महिन्यातील देशातील हा विक्रमी उच्चांक ठरला आहे. कमाल तापमान ४५ अंशांहून अधिक झाल्यास उष्णतेची लाट मानली जाते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

नाशिकमध्ये काय परिस्थिती:
नाशिकमध्ये कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३९.८ अंश सेल्सिअसवर आले असले, तरी वाढलेली आर्द्रता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. किमान तापमानात वाढ होऊन ते २४.३ अंशांवर पोहोचल्याने रात्रीही उकाडा कायम आहे. याआधी रविवारी ४१.४ अंश तापमानामुळे शहरात तीव्र उष्णतेची लाट जाणवली होती.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

तापमानाचा आकडा काहीसा कमी दिसत असला तरी दमट वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. कोंदट हवा आणि सतत येणाऱ्या घामामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

पुढील दोन दिवसांमध्येही उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उकाड्यापासून तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790