नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक !

नाशिक। दि. ३ एप्रिल २०२६: अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांचा टॅब चोरी करून त्यातील वैयक्तिक व संवेदनशील व्हिडिओ तसेच फोटो मिळवले. त्यानंतर हे साहित्य सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींनी दबाव आणण्यासाठी फिर्यादीकडून १० हजार रुपये उकळले होते. तसेच काही व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकी अधिक तीव्र केली.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

दरम्यान, गुरुवारी (दि. २) सायंकाळी ५० हजार रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पैसे स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सातपूर पोलिस ठाणे व गुन्हेशाखा युनिट-२ यांच्या दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून तपास सुरू करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

तपासादरम्यान आरोपी आडगाव शिवारातील ‘दहावा मैल’ परिसरात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसराला वेढा घातला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी संशयित आकाश पुंडलिक बकरे (वय: २८), प्रकाश रामदास पानपाटील (वय: २५), सुरज सुनिल गवई (वय: २७) आणि श्रीपत भिमराव शिंदे (वय: ३८) यांना अटक करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करीत असून, या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790