राज्यात हवामान अस्थिर; नाशिक-जळगावसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीटीची शक्यता

नाशिक, दि. ३१ मार्च २०२६: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक केंद्र, मुंबई व नागपूर यांच्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वारे, गारपीट आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये या बदलत्या हवामानाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे.

वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ६० किमीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही भागांत गारपीटीचा धोका अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

🟠 आज (३१ मार्च) ऑरेंज अलर्ट
राज्यातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये गारपीट, मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

🟡 त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

🟡 १ एप्रिल: अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम
१ एप्रिल रोजी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे. नाशिक, जळगाव, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

🟡 २ एप्रिल: वादळी वाऱ्यांचा जोर वाढणार
२ एप्रिल रोजीही राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

🟡 ३ एप्रिल: काही जिल्ह्यांमध्येच प्रभाव
३ एप्रिल रोजी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

⚠️ नागरिकांना सावधगिरीचा इशारा
हवामान विभागाने नागरिकांना वीजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी तसेच वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सैल वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790