नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक। दि. २२ मार्च २०२६: ‘उत्तम संतती’साठी विधी करून देण्याचे आमिष दाखवत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या प्रकरणात घटस्फोटित महिलेला लग्नाचे आश्वासन देत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये भोंदू अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २२) स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यासह खरातविरुद्धच्या प्रकरणांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

अघोरी कृत्ये, काळी जादू आणि दहशतीच्या माध्यमातून खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. भीतीमुळे पीडित महिला पुढे येत नव्हत्या; मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधून विश्वास दिल्यानंतर तक्रारी नोंदविण्यात आल्या.

एका प्रकरणात, उच्चशिक्षित घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याचे सांगत खरातने तिला गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिला गर्भवती झाल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत, गर्भवती महिलेला आशीर्वादाच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

दरम्यान, पोलिसांनी खरातच्या निवासस्थान व कार्यालयातून सीसीटीव्ही हार्डडिस्क जप्त केल्या असून, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासातून काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसआयटीकडून तपासाला गती:
नवीन तक्रारींनंतर तपासाला वेग देण्यात आला असून, आवश्यक माहिती मिळवण्यासाठी खरातचा ताबा घेण्याबाबत एसआयटी पथकाने हालचाली केल्या. दुपारी त्याला गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून, उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक अधिक सक्रिय झाले असून, तपासाचे केंद्रही बदलण्यात आले आहे. तसेच, पथकात नवीन अधिकारी—विशेषतः महिला अधिकारी—समाविष्ट करून पीडित महिलांशी संवेदनशीलतेने संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790