नाशिक: चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

नाशिक। दि. २० मार्च २०२६: वणी गड (ता. कळवण) येथील श्री सप्तश्रृंगी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा २६ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार असून, यात्रेदरम्यान होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल, पोलीस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले की, गड व पायथ्याशी २४ तास वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवाव्यात. अग्निशमन दल, पोलीस, होमगार्ड व स्वयंसेवकांची संयुक्त पथके सतत कार्यरत राहतील, याची खात्री करावी. गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग, रांग व्यवस्थापन आणि सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे वापरावी.

भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता, वीजपुरवठा यांची योग्य व्यवस्था करण्याबरोबरच स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक, व्हीलचेअर व रॅम्प सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत केंद्र सुरू ठेवण्याचेही निर्देश दिले.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

वाहतूक व्यवस्थेबाबत खाजगी वाहनांना गडावर प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून नांदुरी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बसांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. तसेच यात्रा मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मॉक ड्रिलचे आयोजन, आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता आणि पर्यायी मार्गांची आखणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीसाठी टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवण्यावरही भर देण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

दरम्यान, यात्रेदरम्यान गडावर एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी विशेष नियोजन केले जाणार असून, डोली व्यवस्थाही गड, मध्यवर्ती ठिकाणे आणि पायथ्याशी उपलब्ध करून देण्याबाबत ट्रस्टला सूचना देण्यात आल्या.

सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे यांनी यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करून माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790