नाशिक : उन्हाच्या तीव्रतेत वाढ; तापमान ३७ अंशांवर, पुढील दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

नाशिक। दि. ८ मार्च २०२६: शहरात उन्हाच्या तीव्रतेत झपाट्याने वाढ होत असून शनिवारी (दि. ७) नाशिककरांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागला. शहरातील कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमान १६ अंशांवर नोंदविण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या सुमारास शहरातील अनेक रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे दिसून आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी (दि. ८) तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगोत्सव साजरा करताना तरुणाईने उन्हापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात साधारणतः दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत रविवारी (दि. ८) उष्णतेची लाट राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

तसेच सोमवारी (दि. ९) पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज असल्याने हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मालेगाव येथे ३८ अंश, तर नाशिक शहरात ३७.१ अंश तापमान नोंदविण्यात आले. शुक्रवारीच्या तुलनेत शनिवारी नाशिकमधील तापमानात ०.५ अंशांची वाढ झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतही पुढील पाच दिवस कडक उन्हाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790