नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढली; पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता

नाशिक। दि. ६ मार्च २०२६: शहरासह परिसरात मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गुरुवारी (दि. ५) नाशिकमध्ये कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दिवसा कडक उन्हाचा आणि रात्री उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळही कमी झालेली दिसून येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे मार्चच्या पहिल्या दहा दिवसांतच तापमान चाळिशीच्या जवळ जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या वातावरण कोरडे असल्याने आकाश प्रामुख्याने निरभ्र राहते. त्यातच वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे रात्रीही उकाडा जाणवत आहे. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांकडून पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढला आहे. अनेक घरांमध्ये अडगळीत ठेवलेले कुलर पुन्हा बाहेर काढून वापर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. या स्थितीवरून यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, नाशिकसह पालघर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात फेब्रुवारीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. मार्च महिन्यात पुढील काळात कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790