
✍️ मंदार देशपांडे । दि. १ मार्च २०२६
आजकाल चहाच्या टपरीवर असो किंवा ऑफिसमधल्या लंच ब्रेकमध्ये… एकच विषय ऐकायला मिळतो, “AI मुळे नोकऱ्या जाणार म्हणे!” मोबाईल उघडला की कुठे तरी ChatGPT, कुठे तरी Claude, कुठे तरी ऑटोमेशन, कुठे तरी रोबोट्स. आणि मनात कुठेतरी एक भीती दाटून येते की उद्या आपली गरजच उरणार नाही का?
सत्य असं आहे की AI खूप वेगाने पुढे जातोय. काही वर्षांपूर्वी जी कामं फक्त माणूस करू शकतो असं वाटायचं, ती आज मशीन म्हणजेच AI अगदी सहज करत आहे. बँकेतली अनेक कामं आता काउंटरवर उभं राहून करावी लागत नाहीत. कस्टमर केअरला फोन केला की माणसाऐवजी संगणक उत्तर देतो. लेखन, डिझाईन, अकाऊंटिंग, अगदी कोडिंगसुद्धा AI करू लागलाय. त्यामुळे “नोकऱ्या जाणार” ही भीती पूर्णपणे चुकीची नाही.
अशातच अलीकडेच जगभरात एक मोठी चर्चा झाली ती Anthropic या कंपनीच्या Claude मुळे. अनेक आयटी कंपन्यांनी सांगितलं की आता बेसिक कोडिंग, टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशनचं काम AI काही मिनिटांत करतोय. जे काम आधी टीमला दोन दिवस लागायचे, ते आता काही तासांत होतंय. त्यामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली. काही ठिकाणी नवीन भरती थांबली, काही ठिकाणी “AI सोबत काम करू शकणारे” लोकच प्राधान्याने घेतले जाऊ लागले. हा छोटासा बदल नाही, तर संपूर्ण काम करण्याच्या पद्धतीतला भूकंप आहे.
हो, अनेक नोकऱ्या कमी होतील. विशेषतः जी कामं रोज एकसारखी, रिपीट होणारी आणि नियमांवर चालणारी आहेत, ती कामं मशीन म्हणजेच AI लवकर शिकते. डेटा एंट्री, साधं रिपोर्टिंग, बेसिक डिझाईन, सपोर्ट कॉल्स – या क्षेत्रात बदल जाणवणारच. हे लपवून ठेवण्यासारखं काही नाही.
पण चित्र नकारात्मकच आहे असं नाही. AI मुळे काही क्षेत्रात क्रांतीही होतेय… विशेषतः हेल्थकेअरमध्ये. आज AI एक्स-रे, एमआरआय रिपोर्ट्स वाचून डॉक्टरांना मदत करतोय. कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतंय. ग्रामीण भागात जिथे स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत, तिथे AI आधारित अॅप्स प्राथमिक सल्ला देऊ शकतात. याचा अर्थ डॉक्टरांची गरज संपणार नाही, पण त्यांचं काम अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे. शेवटी अंतिम निर्णय माणूसच घेणार.
शिक्षण क्षेत्रात तर बदल अजून मोठा असणार आहे. आधी सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवलं जायचं. आता AI प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार, कमकुवत आणि मजबूत बाजूंनुसार अभ्यासक्रम तयार करू शकतो. पण याच वेळी एक धोका आहे… जर विद्यार्थी सगळं उत्तर AI कडून कॉपी करू लागला, तर विचार करण्याची सवय कमी होईल. त्यामुळे शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. फक्त पाठांतर नाही, तर क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि प्रत्यक्ष कौशल्यांवर भर द्यावा लागेल.
छोट्या उद्योगांसाठी AI म्हणजे दोन्ही बाजूंनी धार असलेली तलवार आहे. चांगली बाजू अशी की, छोटा व्यवसायसुद्धा आता मोठ्या कंपनीसारखी डिझाईन, मार्केटिंग, ग्राहक सेवा करू शकतो. सोशल मीडिया पोस्ट, जाहिरात, वेबसाइट कंटेंट हे सगळं कमी खर्चात शक्य झालं आहे. पण वाईट बाजू अशी की स्पर्धा प्रचंड वाढेल. कारण सगळ्यांकडे तीच साधनं असतील. त्यामुळे वेगळेपणा आणि विश्वास हीच खरी ताकद ठरणार.
इतिहासात असं आधीही झालं आहे. जेव्हा कारखाने आले, तेव्हा हातमागावर काम करणाऱ्यांना भीती वाटली. जेव्हा संगणक आले, तेव्हा टायपिस्ट घाबरले. इंटरनेट आलं तेव्हा पोस्टमनचं काम कमी झालं. पण त्याच वेळी नवीन क्षेत्रंही निर्माण झाली. आयटी इंडस्ट्री, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स – ही सगळी क्षेत्रं आधी अस्तित्वातच नव्हती.
AI सुद्धा तसंच आहे. तो काही कामं घेईल, पण नवीन कामंही निर्माण करेल. प्रश्न असा आहे की आपण बदलायला तयार आहोत का? AI हुशार आहे, पण तो माणूस नाही. तो भावना समजत नाही, तो जबाबदारी घेत नाही, तो नातं जपत नाही. डॉक्टरांच्या आवाजातली दिलासा देणारी भावना, शिक्षकांच्या शब्दांतली प्रेरणा, लीडरच्या निर्णयातली धैर्य… हे अजूनही माणसाचं वैशिष्ट्य आहे. लोकांना अजूनही माणूस हवा असतो, मशीन नाही.
पुढील पाच ते दहा वर्षांत सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कदाचित थोडं वेगळं असेल. एकाच नोकरीवर अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं. लोक दोन-तीन उत्पन्नाचे मार्ग शोधतील. फ्रीलान्सिंग वाढेल. स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची प्रवृत्ती वाढेल. “AI वापरता येणं” हे बेसिक स्किल होईल, जसं आज मोबाईल वापरणं आहे अगदी तसंच !
उत्पन्न नसेल तर घर कसं चालेल, सरकारला कर कसा मिळेल असाही प्रश्न मनात येतो. पण अर्थव्यवस्था थांबत नाही, ती बदलते. उद्योग बदलतात, कररचना बदलते, सरकार धोरणं बदलते. जगात ‘युनिव्हर्सल बेसिक इनकम’सारख्या कल्पनांवर चर्चा सुरू आहे. अजून ठोस उत्तर मिळत नाही, पण शोध सुरू आहे. कारण शेवटी अर्थव्यवस्थेला माणूसच केंद्रस्थानी आहे. लोकांकडे पैसा नसेल, तर बाजारच चालणार नाही.
खरं सांगायचं तर, येणारा काळ भीतीचा नाही पण आळशी लोकांसाठी कठीण आहे. शिकणाऱ्यांसाठी, धाडस करणाऱ्यांसाठी, आणि वेळेवर दिशा बदलणाऱ्यांसाठी हा काळ संधींचा आहे. AI हा शत्रू नाही. तो एक साधन आहे. जसं मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तसं. प्रश्न इतकाच आहे, आपण त्याचा वापर करणार की त्याच्यापासून पळणार?
आजच्या या रविवारच्या शांत दिवशी एकच विचार करा- “जग बदलतंय… मी त्यासोबत बदलायला तयार आहे का?” कारण भविष्यात टिकणार तोच, जो बदलाला घाबरत नाही !
©️ मंदार देशपांडे, दि. १ मार्च २०२६
📞 9890450002
![]()
