सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी पायाभूत सुविधांना प्रशासकीय मंजुरी

नाशिक। दि. १ फेब्रुवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर, शिर्डी तसेच संबंधित जोड रस्त्यांवरील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व गर्दी व्यवस्थापनाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांना सुमारे ३९० कोटी रुपयांची संयुक्त प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दर्शन पथ व घाटांचा विकास, शाही मार्गाचे पुनर्विकास व सौंदर्यीकरण, विधी भवन व संबंधित धार्मिक सुविधांची उभारणी, शिवसृष्टीसह उद्यान व सार्वजनिक जागांचा विकास तसेच विक्रेत्यांसाठी नियोजित सुविधा उभारण्याचा समावेश आहे. या कामांमुळे भाविकांच्या हालचाली सुलभ होऊन कुंभमेळा कालावधीत नियोजनबद्ध व सुरक्षित व्यवस्थापनास चालना मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

शिर्डी येथे २४.५३ कोटी रुपयांच्या रस्ता व पार्किंगविषयक पायाभूत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये होल्डिंग एरिया, पिक-अप व ड्रॉप-ऑफ व्यवस्था, श्री साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच भाविकांच्या गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यांचा समावेश आहे. कुंभमेळा तीर्थयात्रा परिपथातील महत्त्वाचा धार्मिक केंद्रबिंदू म्हणून शिर्डी येथे कुंभमेळा वारसा दर्शविणारी स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

शिर्डी–संगमनेर दरम्यानच्या महत्त्वाच्या जोड रस्त्यांच्या विकासालाही ९७.२५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, यामुळे आंतरजिल्हा भाविक वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक कुशावर्त कुंड यांच्या जतन व दुरुस्तीसाठी ३.१२ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये फरशीकरण तसेच छत संरचनेच्या दुरुस्तीचा समावेश आहे.

तसेच गोदावरी–नंदिनी संगमाजवळ टाकळी येथे नवीन घाटाच्या बांधकामास ७२.१६ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे घाटाची लांबी सुमारे ४०० मीटरपर्यंत वाढणार असून, प्रमुख स्नान पर्वणीच्या दिवशी भाविकांची क्षमता, सुरक्षितता व गर्दी नियंत्रण अधिक सक्षम होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

या बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, कुंभमेळा प्राधिकरण उपआयुक्त योगेंद्र चौधरी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, महावितरण आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविताना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मंजूर कामांची वेळेत अंमलबजावणी, विभागांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण देखरेख अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790