नाशिक | दि. २१ जानेवारी २०२६: एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या युवकाची हातचलाखीने एटीएम कार्ड अदलाबदल करून तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना जत्रा चौक महामार्गावरील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन गायकवाड (रा. लहवित) यांनी तक्रार दिली आहे. गायकवाड हे दुपारी सुमारे तीनच्या सुमारास संबंधित एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता मशीनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार रखडला होता. याचवेळी काळ्या रंगाचे जॅकेट व हेल्मेट घातलेली एक संशयित व्यक्ती एटीएम कक्षात आली.
‘पैसे निघत नाहीत, कार्ड द्या,’ असे सांगत त्याने मदतीचा बहाणा केला. गायकवाड यांनी नकार दिल्यानंतरही ‘असे कॅन्सल होत नाही’ असे सांगत एटीएम स्क्रीनवर कार्ड लावण्याचा बहाणा करून संशयिताने हातचलाखीने गायकवाड यांचे कार्ड बदलले.
थोड्याच वेळात संशयिताने गायकवाड यांच्या कार्डऐवजी ‘निशाबेन गिगाभाई भाम्मर’ या नावाचे दुसरे कार्ड त्यांच्या हाती दिले. घटनेनंतर सुमारे अर्ध्या तासातच बँकेतून ४० हजार रुपये काढल्याचा संदेश गायकवाड यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.
![]()


