नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७: शहर सुशोभीकरणासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

नाशिक। दि. २१ जानेवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण, सुशोभीकरण व नागरी रचना विषयक कामे तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली, नियोजनबद्ध व सांस्कृतिक संवेदनशीलतेने राबविण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत, शहर सुशोभीकरणासाठी, तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.

कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार असल्याने, शहराचे सौंदर्य, पर्यावरणीय संतुलन व सांस्कृतिक ओळख जपत, विकास करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थापना करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्षपद, पर्यावरणीय लँडस्केप तज्ज्ञ व लँडस्केप आर्किटेक्ट, डॉ. प्राजक्ता बस्ते, यांच्याकडे देण्यात आले आहे. समितीमध्ये सांस्कृतिक वारसा अभ्यासक, दिनेश वैद्य, स्पर्शनीय व अमूर्त वारसा क्षेत्रातील तज्ज्ञ व संवर्धन वास्तुविशारद, समृद्ध मोगल, तसेच कलाकार प्रफुल सावंत यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असल्यामुळे शहर सुशोभीकरणाच्या कामांमध्ये पर्यावरण, वारसा संवर्धन, कार्यक्षम शहरी रचना व सौंदर्यदृष्टी, यांचा समतोल राखला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

समिती, कुंभमेळा प्राधिकरण व त्यांच्यावतीने नेमण्यात आलेल्या, सल्लागार संस्थांना संकल्पना मांडणी, आराखडा तयार करणे, नियोजन, निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी या सर्व टप्प्यांवर तांत्रिक मार्गदर्शन व परीक्षण करणार आहे. समितीच्या कार्यकक्षेत गोदावरी नदीकाठावरील घाटांचे सुशोभीकरण व मजबुतीकरण, प्रमुख प्रवेश मार्ग व रस्त्यांचे सौंदर्यीकरण, महत्त्वाच्या चौकांचे शहरी लँडमार्क म्हणून विकास, उड्डाणपूल व पुलांचे सौंदर्यात्मक सुधारणा यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

सोबतच दिशादर्शक फलक व बहुभाषिक सूचना प्रणाली, घाट, सार्वजनिक जागा व वारसास्थळांचे प्रकाशयोजन, साधुग्राम परिसराचे सौंदर्यीकरण, ‘पेंट माय सिटी’सारख्या उपक्रमांतर्गत, भित्तीचित्रे, दर्शनी भागांचे रंगकाम व सार्वजनिक कला प्रकल्प, शहरातील उद्याने, हरित पट्ट्यांचे व विश्रांतीस्थळांचे नियोजन, तसेच कुंभमेळा मुख्य परिसरासह ५० किलोमीटर परिसरातील महत्त्वाच्या वारसास्थळांचे संवर्धन याबाबत समिती मार्गदर्शन करणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याशी निगडित विधी, परंपरा, लोककला, संगीत व मौखिक परंपरांचे दस्तऐवजीकरण व सादरीकरण यावरही भर दिला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले, “सिंहस्थ कुंभमेळा हा एक जागतीक स्तरावरील धार्मिक सोहळा आहे, यामुळेच सांस्कृतिक, ऐतिहासिक व जागतिक दर्जाची नाशिक व त्र्यंबक शहर घडविण्याची संधी आहे. तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून शहर सुशोभीकरणाची कामे स्थानिक संदर्भ, पर्यावरणीय शाश्वत आणि दीर्घकालीन उपयोग लक्षात घेऊन राबविली जातील, जेणेकरून भाविक व नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि संस्मरणीय अनुभव मिळेल.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790