नाशिक। दि. २१ जानेवारी २०२६: जिल्हा प्रशासन व भारतीय वायुसेनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. २२) आणि शुक्रवार (दि. २३) रोजी गंगापूर धरण बॅकवॉटर परिसरात ‘सूर्यकिरण एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गंगापूर रोडवरील काही मार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
शहर वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दोन्ही दिवशी सकाळी ८ ते ते कार्यक्रम संपेपर्यंत आनंदवली येथून पुढे थेट हरसूलपर्यंत गंगापूर रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा कार्यक्रम होत असून, नाशिक शहरासह बाहेरील जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता आहे.
या कालावधीत आनंदवली गावापासून पुढे बारदान फाटा, गंगापूर गाव व गिरणारे गावाच्या दिशेने जाणाऱ्या एसटी, सिटीलिंक व खासगी बसेस, जड-अवजड मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक करणारी वाहने तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी यांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस सेवेशी संबंधित वाहने व शववाहिकांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांनी दिली.
पर्यायी वाहतूक मार्ग:
- आनंदवली गावातून उजवीकडे वळून चांदशी पुलावरून मुंगसरा फाटा मार्गे पुढे दुगाव मार्गे वाहने ये-जा करतील.
- गंगापूर रोडवरील भोसला शाळेसमोरील गेटजवळून सावरकरनगर मार्गे बापू पुलावरून पुढील मार्गासाठी वाहतूक वळविण्यात येईल.
नागरिकांनी नियोजित वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
![]()


