नाशिक। दि. १९ जानेवारी २०२६: प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दीच्या मार्गांवरील ताण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दोन अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ–मिरज आणि अमरावती–पनवेल या मार्गांवर धावणाऱ्या या गाड्यांना मनमाड व नाशिक परिसरात थांबे असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
भुसावळ–मिरज अनारक्षित विशेष गाडी (क्र. ०१२०९) ही २३ जानेवारी रोजी भुसावळ येथून सायंकाळी ४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मिरज–भुसावळ विशेष गाडी (क्र. ०१२१०) ही २६ जानेवारी रोजी मिरज येथून सायंकाळी ७ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे दाखल होईल. या गाडीला मनमाड, कोपरगाव, बेलापूर आणि अहिल्यानगर येथे थांबे देण्यात आले आहेत.
तसेच अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष गाडी (क्र. ०१४१६) ही २२ जानेवारी रोजी अमरावती येथून दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल–अमरावती परतीची विशेष गाडी (क्र. ०१४१५) ही २६ जानेवारी रोजी पनवेल येथून सायंकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता अमरावती येथे पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे दोन्ही बाजूंनी थांबे असतील.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. प्रत्येकी १८ डब्यांची रचना असलेल्या या गाड्यांमध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. संपूर्ण गाडी अनारक्षित असल्याने तिकीट उपलब्धतेवरील ताण कमी होऊन सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः अल्प व मध्यम अंतर प्रवास करणाऱ्या, नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. सण-उत्सव व गर्दीच्या काळात प्रवासी क्षमतेत वाढ होऊन नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
या विशेष गाड्यांचे थांबे, आगमन-प्रस्थान वेळा आणि सविस्तर वेळापत्रकाची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एनटीईएस मोबाईल अॅपवर तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती घेऊन नियोजन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]()


