
नाशिक। दि. १८ जानेवारी २०२६: भारतीय वायुदलाच्या सहकार्याने आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 22 व 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गंगापूर धरण येथे एअर शो होणार आहे. या शोच्या यशस्वितेसाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळी गंगापूर धरण येथे एअर शो संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल (नि.) विलास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, राज्यात प्रथमच अशा प्रकारचा शो होत आहे. त्यात वायुदलाचे वैमानिक प्रात्यक्षिक दाखवतील. या शो मुळे तरुणांना सैन्य दलात भरतीसाठी प्रेरणा मिळेल. हा शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा शो अपघात विरहित होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने सोपविलेली जबाबदारी पार पाडावी.
कार्यक्रम होत असलेल्या परिसरात या दिवशी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच खाद्यपदार्थ व इतरही स्टाॅल असणार आहेत. याठिकाणी राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व माजी सैनिक यांची मदत घेण्यात येणार आहे, असे सांगत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहेत. येणा-या नागरिकांनी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करावीत. या शोसाठी परस्पर समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले.
![]()


