
नाशिक। दि. २ डिसेंबर २०२५: नाशिक शहरात खुनाचा प्रयत्न तसेच गंभीर दुखापत यासारख्या दोन गंभीर गुन्हयातील संशयित आरोपीला नाशिक शहर पोलिसांच्या अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली.
दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी भद्रकाली पो.स्टे. हद्दीत म्हसोबा मंदीराजवळ, भगवती नगर, नानावली, नाशिक येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून कुरापत काढून चॉपर व लाथाबुक्यांनी मारहाण फिर्यादी आकाश युवराज परदेशी यांना गंभीर दुखापत केली होती. त्याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.
तसेच दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजी फिर्यादी अनिल सुभाष चव्हाण यांना कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने रिक्षात टाकुन दोन्हीही पायावर गुडघ्याच्या खाली ठिकठिकाणी धारदार हत्यारांनी वार करून जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले आणि त्यांना अंबिका नगर झोपडपट्टी येथील पाटाजवळ फेकुन दिले होते. त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिल गंभीर ०२ गुन्हे दाखल झाल्यापासुन संशयित आरोपी रोहिदास आहेर हा त्याचे अस्तीत्व लपवत हरसुल, पुणे येथे एक वर्षापासुन राहात होता. हा संशयित आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना प्राप्त झाली.
संशयित आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस नाईक भुषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारूदत्त निकम यांनी पुणे येथे जावुन अमनोरा मॉल हडपसर रोड, पुणे येथे सापळा लावला. संशयित आरोपीच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून संशयित आरोपी रोहिदास वामनराव आहेर (वय-२५ वर्षे, राहणार: शिलावटे चाळ नवनाथ नगर पेठ रोड, पंचवटी) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढिल कारवाईकामी पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
![]()
