नाशिक। दि. २ डिसेंबर २०२५: नगरपिरषद/ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जिल्ह्यात 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावण्यात यावा यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व खणिकर्म विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील 28 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार खाजगी आस्थापनांमधील (दुकाने, खाद्यगृहे, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स इ.) कर्मचारी, कामगार व अधिकारी यांना 2 डिसेंबर 2025 रोजी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे, असे कामगार उप आयुक्त नाशिक विभाग विकास माळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासन निर्णयात आदेशित केल्यानुसार राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने (खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.). इत्यादींना लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार व अधिकारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेलच तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी. शासन निर्णयातील सुचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.
याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी दि.त्र्य. पाटोळे, सरकारी कामगार अधिकारी (मो.क्र. 9136871898), तु.गं. बोरसे, सरकारी कामगार अधिकारी (मो.क्र. 9890150632), नि.रं. खैरनार दुकाने निरीक्षक (मो.क्र. 7387731931), यो.मा.जाधव, दुकाने निरीक्षक (मो.क्र. 7741861351) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कामगार उप आयुक्त श्री. माळी यांनी कळविले आहे.
![]()
