नाशिक: गोविंदनगर ते मुंबई नाका वाहतूक सुरू करा; वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा

नाशिक। दि. १ डिसेंबर २०२५: इंदिरानगर बोगदा रुंदीकरणाच्या निमित्ताने बंद करण्यात आलेली मुंबई नाका ते गोविंदनगर दुतर्फा वाहतूक सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा; सिटी सेंटर मॉल सिग्नल, बाजीरावनगरसह गोविंदनगर रस्त्यावर होणार्‍या सततच्या वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने सोमवारी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना दिले.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने सोमवारी, १ डिसेंबर रोजी गोविंदनगरमधील रहिवाशांनी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. इंदिरानगर बोगदा रुंदीकरण कामाच्या निमित्ताने गोविंदनगर ते मुंबई नाका भागाकडे एका बाजूने वाहनबंदी करण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्तींसह रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील दुतर्फा वाहतूक खुली करावी, अशी मागणी करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  राज्यात थंडीचा कडाका वाढणार; तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता

सिग्नलची व्यवस्था करा:
सिटी सेंटर मॉल सिग्नल, आर डी सर्कल, मिलिंदनगर, बाजीरावनगर आणि गोविंदनगर मिठाई दुकान चौकात दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा; आवश्यक त्या ठिकाणी पोलीस तैनात करा; गोविंदनगर रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करावी, त्यासाठी महापालिकेकडे अहवाल पाठवावा.

उड्डाणपूल, स्कायवॉकसाठी शिफारस करा:
या रस्त्यावर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, त्यासाठी सिंहस्थ प्राधिकरणाकडे पोलीस आयुक्तांनी अहवाल द्यावा. सकाळ-सायंकाळ जॉगिंग ट्रॅकवर जाणार्‍या नागरिकांची वर्दळ असते. सद्गुरूनगर, जुने सिडको, सदाशिवनगर, कोशिकोनगर, कर्मयोगीनगर या भागातील रहिवाशांचे गोविंदनगरला पायी येणे-जाणे असते. अनेकांचे अपघात होतात. रहिवाशांच्या सोयीसाठी स्कायवॉक करण्याची शिफारस महापालिकेकडे करण्यात यावी.

⚡ हे ही वाचा:  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

पोलीस गस्त वाढवा:
गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे सायंकाळी दारूड्यांचे अड्डे झाले आहेत. सकाळी ट्रॅकवर दारूच्या बाटल्यांचा ढिग असताना याचा जॉगर्सना त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी. प्रभाग २४ मधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सकारात्मक विचार करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिले.

⚡ हे ही वाचा:  नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी

यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत घोंगे, राधाकृष्ण जाधव, प्रकाश नाईक, बापुराव पाटील, धरमचंद चौधरी, रमेश पाध्ये, कारभारी मोरे, नारायण कासार, प्रथमेश घाटकर, शेखर पुंड, दिलीप जगताप, सिताराम गुंजाळ, ज्ञानेश्वर चौधरी, शामराव पळशीकर, कृष्णाजी विसाळे, सुरेश शिरोरे, सुभाष चौहान, सूर्यकांत आहिरे, एन. डी. मोरे, रवींद्र सोनजे, संजय टकले, प्रभाकर खैरनार यांच्यासह रहिवाशी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here