
नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२५: तीन आठवड्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातून मुलाच्या साखरपुडा कार्यक्रमाला तपोवनानात आलेल्या महिलेची सव्वाशे ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स चोरी प्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले.
आडगाव पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवत थेट मध्यप्रदेश गाठत संशयिताच्या घरातून साडेबारा लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले. संशयित आरोपी विकास सनसी हा पोलिस येत असल्याची भणक लागताच फरार झाला. फिर्यादी महिलेस ऐवज सुपूर्द करण्यात आला. साध्या वेशातील पोलिसांनी चोरट्याच्या घरात धाड टाकली.
दि. ६ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सुषमा शेषराव निर्वाण यांनी साखरपुडा कार्यक्रमात पर्स बाजूला खुर्चीवर ठेवली. कोणीतरी त्यांचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित पर्स नेताना दिसून आला. पोलिस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षण सतीश जगदाळे, हवालदार दादासाहेब वाघ, शेख, पोलिस
नाईक भुजबळ व लिलके असे पोलिस पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. मात्र, पोलिस आल्याची भणक लागताच संशयित पसार झाला. त्यावेळी स्थानिक पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित विकास सनसी याचे घर गाठत त्याच्या घरातून दागिने जप्त केले.
![]()
