
नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२५: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा दुर्घटनारहीत होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपत्ती निवारणार्थ समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करून आवश्यकतेनुसार परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभेमळा अंतर्गत येणाऱ्या कुंभमेळा 2027 च्या तयारीचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन योजनेच्या अंमलबजावणी बाबत चर्चेसाठी आज सकाळी महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, कुंभमेळा पावसाळ्यात आहे. नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीला सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक साधने, यंत्रसामग्रीसह सतर्क राहणे आवश्यक आहे. महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, आरोग्य विभाग, जलसंपदा, जिल्हा परिषद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आदींचा समन्वय आवश्यक आहे. अमृत स्नान मार्ग, घाट परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था राहील, असे नियोजन करावे. आरोग्य विभागाने आपापल्या आरोग्य संस्थांचे अद्ययावतीकरण करून घ्यावे. या कालावधीत पुरेशी यंत्रसामग्री, औषधे, वैद्यकीय उपचार पथके कार्यरत राहतील, असे नियोजन करावे. त्यासाठी नियुक्त सल्लागार संस्थेने संबंधित प्रत्येक विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधत त्यांच्या गरजांचा प्रस्तावात समावेश करून घ्यावा. तसेच सर्व विभागांची कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
आयुक्त श्रीमती खत्री, अपर पोलिस अधीक्षक श्री. मिरखेलकर यांनी महानगरपालिका व पोलीस विभागाच्या माध्यमातून आपत्ती निवारणार्थ सुरू असलेल्या उपाययोजना आणि सादर केलेला प्रस्ताव याविषयीची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनीही यावेळी विविध सूचना केल्या.
यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, महानगरपालिका उपायुक्त स्मिता झगडे, उपस्थित होते, तर अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, ‘यशदा’चे विश्वास सुपणेकर आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
![]()
