
नाशिक। दि. २८ नोव्हेंबर २०२५: कॉलेज रोड, गंगापूर रोड, महाविद्यालय परिसरात गावठी कट्टा बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. निनावी फोन आल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने संशयिताचा माग काढत रामवाडी परिसरात ही कारवाई केली. रोहित कापकर (रा. पगारे चाळ, रामवाडी) असे या संशयिताचे नाव आहे. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त केले.
गंगापूररोड, कॉलेज रोड परिसरात एक जण कमरेला गावठी कट्टा लावत दहशत निर्माण करत आहे, अशी माहिती गुंड विरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली. सदर इसम रामवाडी परिसरात राहणारा असल्याची माहिती समजली. पथकाने त्याच्या घरी छापा मारला. त्याने पलायन केले. पथकाने पाठलाग करत शीतळा देवी मंदिरासमोर त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त केले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
![]()
