नाशिक। २५ नोव्हेंबर २०२५: बंगालच्या उपसागरात पुढील दोन दिवसांत ‘सेन्यार’ नावाचे चक्रवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या प्रणालीच्या परिणामस्वरूप राज्यात आगामी आठवड्याभरात पुन्हा कडाक्याच्या थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मलाक्का सामुद्रधुनीपासून दक्षिण अंदमान समुद्रापर्यंत आणि मलेशिया किनाऱ्यालगत सोमवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता सतत वाढत आहे. हा कमी दाबाचा परिसर बुधवारी पूर्ण विकसित वादळाच्या स्वरूपात परिवर्तित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
दरम्यान, या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून ते सुमारे १२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत वायव्य भारतात तापमानाचा पारा खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतातही अशाच प्रकारे थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
सोमवारी हरियाणातील हिसार येथे ७.४ अंश सेल्सियस इतके हंगामातील किमान तापमान नोंदवले गेले. आगामी काही दिवस किमान तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नसली तरी नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात अधिक तीव्र थंडी जाणवेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.
![]()
